प्रसिद्धी पत्रक: डॉ. विनोद मोहितकर विद्यापीठाचे पहिले प्र-कुलगुरू New

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे

विद्याविहार, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड – ४०२ १०३
प्रसिद्धी पत्रक दिनांक:- १२ ऑक्टोबर २०२६

डॉ. विनोद मोहितकर विद्यापीठाचे पहिले प्र-कुलगुरू

सुधारित अधिनियमान्वये नव्याने निर्माण झालेल्या पदावर माजी तंत्रशिक्षण संचालकांची नियुक्ती

लोणेरे (जि. रायगड), [दिनांक] : महाराष्ट्र राज्याचे माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद महादेवराव मोहितकर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, २०२६ अन्वये विद्यापीठात प्र-कुलगुरू हे पद नव्याने निर्माण करण्यात आले असून, या पदावर नियुक्त होणारे डॉ. मोहितकर हे विद्यापीठाचे पहिले प्र-कुलगुरू ठरले आहेत. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने कुलगुरूंशी विचारविनिमय करून अधिनियमाच्या कलम १४अ अन्वये ही नियुक्ती केली आहे.

डॉ. मोहितकर यांना तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय व शैक्षणिक कार्याचा पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव आहे. तंत्रशिक्षण संचालनालयात सहायक संचालक व उपसंचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव व संचालक आणि सन २०२३ ते २०२६ या काळात राज्याचे तंत्रशिक्षण संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. राज्यातील स्वायत्त अभियांत्रिकी व पदविका संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व राष्ट्रीय श्रेयांक आराखडा लागू करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. टेक्विप (TEQIP) प्रकल्पाचे राज्य समन्वयक म्हणून १६२.५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची अंमलबजावणी, आयआयटी मुंबईसोबत १५ संस्थांच्या मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार, तसेच शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये थ्री-डी प्रिंटिंग, रोबोटिक्स व ऑटोमेशनची उत्कृष्टता केंद्रे ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. प्रशासकीय सुधारणा व ई-गव्हर्नन्स उपक्रमांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘सर्वोत्कृष्ट संचालक/आयुक्त’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

डॉ. मोहितकर हे व्हीएनआयटी, नागपूर येथून स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधर असून, त्यांनी एम. एस. विद्यापीठ, बडोदा येथून एम.ई. (प्रथम क्रमांक) आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेत पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार संशोधकांना पीएच.डी. प्रदान झाली असून, त्यांच्या नावावर तीन पेटंट्स व ३९ शोधनिबंध आहेत. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, व्हीएनआयटी नागपूर, आयआयआयटी पुणे व नागपूर, एनआयटीटीटीआर चेन्नई यांच्या नियामक मंडळांवर, तसेच याच विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.

सुधारित अधिनियमानुसार प्र-कुलगुरू हे कुलगुरूंनंतरचे विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक व कार्यकारी अधिकारी असून, शैक्षणिक नियोजन, शैक्षणिक लेखापरीक्षण, गुणवत्ता हमी, उद्योग व संशोधन संस्थांशी समन्वय आणि निधी देणाऱ्या संस्थांशी संपर्क ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.

या नियुक्तीबद्दल बोलताना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लाभलेले हे विद्यापीठ राज्याच्या तंत्रशिक्षणाचा कणा आहे. डॉ. मोहितकर यांचा राज्यस्तरीय तंत्रशिक्षण प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव, परीक्षा व संलग्नता व्यवस्थेची सखोल जाण आणि उद्योगजगताशी असलेले दृढ संबंध यांचा लाभ विद्यापीठाला शैक्षणिक गुणवत्ता, वेळेवर निकाल आणि संशोधन-नवोपक्रमाच्या वाटचालीत निश्चितच होईल. विद्यापीठ परिवारातर्फे मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो.”

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. मोहितकर म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लाभलेल्या या विद्यापीठाचा पहिला प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी सन्मान आणि जबाबदारी दोन्ही आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील आणि कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करून प्र-कुलगुरू पदाची निर्मिती केल्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे. कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वेळापत्रकाचे काटेकोर पालन, परीक्षा व निकाल वेळेत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, संलग्न महाविद्यालयांतील गुणवत्ता संवर्धन आणि उद्योग व संशोधन संस्थांशी भक्कम भागीदारी यांना माझे प्राधान्य राहील. राज्याच्या कानाकोपऱ्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिक्षण व रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत, यासाठी मी सर्व सहकाऱ्यांसोबत कटिबद्धपणे काम करीन.”

डॉ. मोहितकर 12.10.26 रोजी पदभार स्वीकारणार आहेत.